आडवाटेची भटकंती – किल्ले टकमक

दुर्गप्रेमी,हाडाचे डोंगरभटके,आणि सर्व गिरीमित्रांना माझा मानाचा मुजरा….

वर्षाऋतु चालू झाला की आम्हां सह्याद्रीवेड्या जीवांना वेध लागतात ते पावसाळी भटकंतीचे…लवकरात लवकर जास्त पाऊस पडावा, आज पाऊस का नाही पडला??किंवा धबधबे,ओहळ चालू झाले असतील की नाही?? असे असंख्य प्रश्न आम्हां ट्रेकर्स जमातीला घरी बसून पडत असतात.मग फेसबुकवर कोण कुठे जाऊन आले आणि तेथील फोटो आवडले तर त्या मित्राला लाडीगोडी लावून तो वैतागेपर्यंत त्याला प्रश्न विचार किंवा मग मुंबई हाईकर्स वर जाऊन कॅलेंडर चेक कर त्यात एखादा ट्रेक आवडला तर आपल्या बजेटमध्ये बसतोय का ते पाहणे,गुगलबाबाला आळवत राहणे असे आमचे बिनकामाचे पावसाळी उद्योग चालू होतात.काही भटके तर पावसाळ्यात त्यांना आवडणाऱ्या गडांना भेट देतात.म्हणजेच काही भटक्यांना धो धो बरसणारा पाऊस राजधानी रायगडावर अनुभवायला आवडतो तर काहींना धबधब्यांनी भरून गेलेली राजमाची पाहायला आवडते.काहीजण धुक्यात गढून गेलेले भीमाशंकर अनुभवायला जातात तर काहीजण पावसाचा सामना करत महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई गाठतात.गर्दीपासून जितके दूर जाता येईल तेवढे पळण्याचा आमचा विचार असतो कारण तिकडे दर्दी ट्रेकर्सची कमी असते.असे एकाहून एक वेडे आपल्या सह्याद्रीत दडलेले आहेत.असं वेड जगाच्या पाठीवर कुठे मिळणार नाही त्याचा अनुभव फक्त महाराष्ट्रातच येऊ शकतो.फक्त अशा डोंगरवेड्यांना हुडकून ‘चल ना दादा मलापण
ट्रेकला घेऊन’ असे म्हणण्याची कामगिरी आपली आहे.

पावसाने वातावरण निर्मिती केलेली होती आणि पावसाळी भटकंतीचा श्रीगणेशा करायची वेळ जवळ येऊन ठेपली होती.शनिवार संपून रविवार उजाडत आला तरीसुद्धा अजून काही नक्की झाले न्हवते.घड्याळात दहा वाजून गेले पण अंथरून सोडायचे काही नाव नाही.दोन मित्रांच्या अंथरुणावरुन खाणाखुणा चालू होत्या.गुगलला राम राम करून टकमकवर सर्व गाडी येऊन ठेपली.

ठाणे जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सकवार गावच्या पाठीमागे असलेला पुरातन किल्ले टकमक भटक्यांची वाट पाहत दिमाखात उभा आहे.गर्द झाडी आपल्या अंगाखांद्यावर मिरवत व प्राचीन अवशेष उरात बाळगत,निसर्गाच्या जादुई दुनियेत घेऊन जाणारा किल्ले टकमक होय.

गडाचा इतिहास :
1) 12व्या शतकात राजा भिमदेव बिंब याने या गडाची निर्मिती केली.महिकावती राजधानीच्या शेजारी असलेल्या प्रांतात घाट माथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी या गडाचा प्रामुख्याने उपयोग केला गेला अ सावा.१४ व्या शतकात गुजरातच्या बहादुरशहाने हा गड जिंकून घेतला.१५ व्या शतकात मराठ्यांनी गड काबिज केला व त्यानंतर पोर्तुगीज यांनी या गडाचा ताबा घेतला.१७२०ते १७३७ वसई मोहीमे दरम्यान चिमाजी अप्पा यांच्या आग्रहाने पंताजी मोरेश्वरांनी हा गड काबिज केला. १८६० मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात हा गड गेला. गड उध्वस्त करून पुन्हा बसणार नाही याची खबर त्यांनी घेतली.त्यानंतर कैदखाना म्हणून या गडाचा वापर केला गेला.

बाहेर पाऊस वेडावत होता पण एकदा मनाशी ठरले की माघार नाही हा आमचा नेहमीचा शिरस्ता कायम राखला गेला.सोबत भटकंतीचे साथीदार अजिंक्य आमटे होते.सर्व आवरून मालाड स्टेशन गाठेपर्यंत अकरा वाजले.आमचा प्रखर इरादा पाहून चक्क पावसाने माघार घेतली होती.गर्दीने भरलेली विरार गाडी पकडून एकदाचा निघालो.विरार स्टेशनपर्यत यायला बारा वाजले.विरार-वसई महानगर पालिकेच्या बस दर पंधरा  मिनिटाने शिरसाड येथे जाण्यासाठी निघतात.गर्दी असेल तर इथे गाडीसाठी रांग सुद्धा लागते.मार्केटमध्ये पोचतोय तोपर्यंत बस लागली होती.शेवटची सीट पदरात पडल्यामुळे जरा बरे वाटले.पुढे काय वाढून ठेवलेय याची जाणीव तेव्हा न्हवती पण मोकळा रस्ता पाहून जोशात आलेला ड्रायव्हर गतीरोधकावर सुद्धा ब्रेक न मारता गाडी हाकायला लागला तेव्हा मागची सीट म्हणजे किती सुख असते ते चांगलेच कळले.तुंगार फाटा इथे अर्ध्या तासात पोचलो.एव्हाना वातावरण बदलून आकाश निरभ्र झाले होते.नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे हवेत कमालीचा थंडावा जाणवत होता.फाट्यावर चहाची तलफ भागवून पाण्याच्या दोन बाटल्या बॅगेत कोंबल्या.ईथुन सकवारला जायला टमटम(दहा आसनी)गाडी मिळते हे ऐकून होतो पण टमटमचा काही पत्ता न्हवता.व घरून उशिरा निघाल्यामुळे इथपर्यन्त यायलाच बारा वाजून गेले होते.सकवार हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव पश्चिम दुत्रगती महामार्गला जोडून असल्याचे माहीत होते त्यामुळे दिसेल त्या वाहनास हात दाखवायला सुरुवात केली.आमच्या नशिबाने एक मराठी टेम्पोवाल्या काकांनी गाडी थांबवली.अंगात मावळा हे टीशर्ट होते त्याचा परिणाम असावा बहुतेक..एकदाचे मार्गी लागलेलो बघून जरा हायसे वाटले.टेम्पोवाल्या काकांना त्यांची सगळी स्टोरी विचारून अगदी कसा धंदा करतात,प्रॉफिट किती आहे इथपर्यन्त प्रश्न विचारून झाले.काकासुद्धा तल्लीन होऊन आपली स्टोरी सांगायला लागले.शेवटी दोन बोलघेवड्या ट्रेकर्सची त्यांची गाठ पडली होती.

एवढ्यात सकवार गावचा आणि गोशाळा विषयी माहिती असलेल्या बोर्ड रस्त्याच्या डाव्या बाजूला दिसू लागला.काकांना धन्यवाद देऊन निरोप दिला.घड्याळात दुपारचे एक वाजले होते.ब्रीजच्या उजव्या बाजूला सरळ सकवार गाव चालु होतो.धुक्यात  बुडालेल्या टकमकचे इथून मनोहर दर्शन होत होते.आम्हाला कुठे जाऊन परत यायचे आहे त्याची कल्पना आली आणि हे वेगाशिवाय शक्य न्हवते त्यामुळे वेग कमालीचा वाढवला.पाच मिनिटे चालल्यावर एक ओढा रस्त्यातच लागतो.रविवार असल्याने शाळेला जाणारी लहान मुले ओढ्यात मस्तपैकी डुंबत होती.काही मोठी माणसे मासे पकडताना दिसत होती.सकवार गाव हा कोकणात आल्याचा भास देतो.घरांच्या बाजूला पसरलेली हिरवीगार भातशेती,विहिरीवरून हंडाकळशी घेऊन पाणी भरणारी बायामाणसे,गुरे रानात चरायला घेऊन निघालेले गुराखी,खळखळून वाहणारा ओढा,पारावर गप्पा मारायला बसलेली मंडळी,धरणात डुंबणारी लहान मुले हि तिथली काही दृश्ये होती.आजचा दिवस आपण एका वेगळ्या जगात जगणार आहोत याची मनोमन खात्री पटली.डांबरी सडकेने सरळ निघालो गावातील काहीजण नवखे दिसतात व इतक्या दुपारी हे गड पाहून परत येतील का असे त्यांच्या कपाळावर प्रश्न पडले होते.गावात जेवणाची सोय न्हवती.गावात प्रवेश करताना ग्रामपंचायतीजवळ एक घर आहे टकमकला नंतर चार-पाच वेळा जेव्हा भेट दिली तेव्हा त्यांना अगदी पटवून जेवण करायला सांगितले आणि व्यवसाय म्हणून याकडे लक्ष घाला असेही बजावले. कारण हा किल्ला पण लवकरच ट्रेकिंगच्या विश्वात प्रसिद्ध होणारा असाच आहे.

पहिलीच वेळ असल्याने गावकऱ्यांना रस्ता नीट विचारून घेतला.इथून पुढे दहा मिनिटे चालल्यावर सकवार गावचे ग्रामदैवतेचे मंदिर आहे.या मंदिराच्या डाव्या बाजूला खाली एक वाट सरळ जंगलात उतरली आहे.थोडे चालल्यावर एक घर लागते घराच्या उजव्या बाजूने गेलेल्या वाटेने सरळ खराखुरा ट्रेक चालू होतो.चालत चालत मोकळ्या माळरानावर पोचलो.सागाची असलेली दाट झाडी लक्ष वेधत होती.डाव्या बाजूला एक ओढा खळखळत होता.माळरानावर ढोरवाटा सगळीकडे पसरलेल्या,घनदाट होत जाणारे जंगल आणि मळलेली पायवाट सुद्धा नाही आता खरा कस लागणार होता.मग शेवटचा उपाय म्हणून किल्ला समोर ठेवून दिशा निश्चित केली आणि आडव्या वाटांची चाचपणी केली तर ओढा ओलांडल्यावर एक वाट वरच्या दिशेने सरकताना दिसली मग शेवटी त्या वाटेने निघालो.कधी मोकळे पठार तर कधी भाताची खाचरे तुडवत,गच्च भरलेल्या झाडीतून वाट शोधताना कसब पणाला लागले होते.

किल्ल्याच्या बाजूला गावकऱ्यांची शेती असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात गावकरी येथे शेतात काम करताना हमखास दिसणार इथे तात्पुरत्या निवाऱ्यासाठी आणि शेतराखणीसाठी त्यांनी झोपड्यासुद्धा बांधल्या आहेत.पावसाळा चालू असल्याने गावकरी शेतात काम करताना दिसत होते.एक भाऊंनी तर बैल नांगराला जुंपून ठेवले होते फक्त बैलांना आवाज द्यायचा अवकाश..मस्तपैकी पानांची चंची सोडून बांधावर पानसुपारी तोंडात कोंबून भाऊंनी नांगराला हात लावला बैल काही बोलायच्या अगोदरच फेरे घ्यायला लागले तेव्हा आमची गावची सागर-राजाची बैलजोडी आठवली काठीशिवाय नांगर अचूक चालणारी पण वडिलांशिवाय कोणाला हात लावू न देणारी मी कधी नांगर धरायचा प्रयत्न केलाच तर तर त्यांना बरोबर कळायच की पाठीमागचा नवखा आहे मग काय सरळ बांधाच्या बाहेर वरात निघायची.अशा अनेक आठवणी उलगडू लागल्या. वेळ झाल्यामुळे भाऊंचा  निरोप घेतला वाट माहिती करून पुन्हा टकमककडे वळलो.भाताची खाचरे आणि मोकळी पायवाट संपल्यावर परत एक छोटा ओहळ लागतो.पाण्यात मस्तपैकी बुचकळून ताजातवाना झालो.थकवा कुठच्याकुठे पळून गेला होता.
या कातळाच्या बाजूने डाव्या हाताला एक वाट सरळ गडाच्या दिशेने वर गेली.पक्की खातरजमा करून निघालो.पाऊस पडल्यामुळे वाटेवर चिखल होऊन वाटा घसरट झाल्या होत्या.दगड येऊन वाटेवर पसरले होते.अनोळखी वाटेवरून आम्ही दोघेजण घनदाट जंगलातुन चाललो होतो.किल्ल्यावर आजच्या दिवसात कोणीही गेले न्हवते असे ती वाटच बोलत होती.

दोनचार कातळटप्पे पार केल्यावर ऐन गडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पोचलो होतो.आता चढाई सरळसोट दम काढणारी होती.डोंगराच्या धारेवरून चालत पठारावर पोहोचलो.पुढे घोड्यासारख्या दिसणाऱ्या जागेला वळसा घालून पश्चिमेकडील तटबंदी वरून आपला टकमक गडावर प्रवेश होतो.  इथे कातळकोरीव पायऱ्या आहेत.सुरुवातीला पाण्याचे 2 टाक व पुढे गेल्यावर ३ टाक्यांचे २ समुह आहेत अशी एकूण 12 टाकी गडावर आढळतात.तसेच उजवीकडे 2 बांगडी तोफा आहेत.समोरच्या  डोंगरावर टेहळणीची जागा दिसते.पुढे पठाराच्या उत्तर टोकावरील कातळात २ फूट व्यासाचे व २ फूट खोल २ खड्डे कोरलेले पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळी या टोकावर बसून टेहळणी करणार्‍या टेहळ्यांना पाणी पिण्यासाठी जागा सोडून जावे लागू नये म्हणून हि योजना करण्यात आली होती. हे खड्डे ठराविक वेळाने जवळाच्या पाण्याच्या टाक्यातून पखालींनी पाणी आणून भरले जात असत. टकमक गडावरून  दक्षिणेला कामण गडाची डोंगररांग दिसते. पश्चिमेला समुद्राला मिळणारी वैतरणा नदी दिसते तर पूर्वेला वांदरी तलाव छान दृष्टीक्षेपात येतो.

वर्षा ऋतूमधील जुलै,ऑगस्ट तसेच गुलाबी थंडीचे नोव्हेंबर,डिसेंबर या ठिकाणाला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी असेल.या दिवसात हा गड हिरव्यागर्द वनराईने नटलेला असतो.निसर्गसौंदर्याची चौफेर उधळण झालेले असे हे ठिकाण आहे.मुंबईतील विरारमध्ये सकवार गावच्या पाठीमागे हे असे काहीतरी अद्भुत दडलेले आहे यावर प्रथमदर्शनी विश्वासच बसत नाही परंतु एका फेरीत हा किल्ला आपल्या आवडत्या सूचित हमखास जोडला जातो याची माझ्याकडे खात्री आहे.किल्ला पाहण्यासाठी जाताना गावातील स्थानिक वाटाड्या घेणे क्रमप्राप्त आहे नाहीतर दिवसभर जंगलाच्या चक्कर मारून चुकण्याचा धोका जास्त आहे.

असे सुंदर गडदर्शन झाल्यावर घरून आणलेला डबा काढून आम्ही जेवायला बसलो.जेवण उरकेपर्यंत 4 वाजले होते आता वेळ आली होती निरोपाची तसेच न थांबता गड उतरायला घेतला.जंगलातील रानफुले व पक्षांचे आवाज अनुभवत ओढ्यामध्ये बुचकाळत एकदाचा गावात पोचलो घरी जायला मन अजून तयार न्हवते.कसातरी पाय ओढत मुख्य हायवेवर आलो तर टमटम वाले दादा आमची वाट पाहतच होते मग टमटम ने फाट्यापर्यंत व नंतर मिडी बसने विरार स्टेशन असा प्रवास करत या अनोख्या आठवणीत राहणाऱ्या निसर्गसफरीची समाप्ती केली ते पुन्हा इथे येण्यासाठीच….

किरण प्रकाश भालेकर
Bhalekar117.Blogspot.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *