कोकण सफर
श्री देव सप्तेश्वर मंदिर
कसब्यातलं कर्णेश्वर मंदिर अन् देसाईंचा वाडा पाहून निघालो, चौकात संभाजी महाराजांच्या स्मारका जवळ ST साठी काही मंडळी अन् कॅालेजची मुलं थांबली होती, पण येताना गाडीतून पाहिलेलं, दाटीवाटीनं रस्त्याच्या दुतर्फा असलेलं टुमदार कौलारू घरांचं गाव बघायचं म्हणून म्हटलं चालतच हायवेला जाऊया. पुढं सप्तेश्वराचं मंदिर गाठायचं होतं. गावातल्या भैरी भवानी मंदिराजवळून एक वाट सप्तेश्वराला जाते पण वाट पूर्णतः दाट जंगलातून जाते अन् वाट आता तितकीशी वापरातील नाही. गावात घरांचे अन् घरांसोबतचे फोटो काढत हायवेला आलो. तिथून रिक्षा घेतली, फाट्यापासून संगमेश्वर ST डेपोकडं निघालं की साधारण दीड किलोमीटर नंतर डाव्या हाताला पेट्रोल पंप सोडला की डाव्या हातालाच एक रस्ता चढणीला लागतो, तो संपूर्ण डोंगर चढत खालची भंडारवाडी, लावगणवाडी अशा वाड्या मागे टाकत घनदाट जंगलाने वेढलेल्या अगदीच निर्मनुष्य अशा सप्तेश्वराच्या मंदिरात पोहचलो. मंदिर परिसर प्रशस्त अन दाट सावलीचा आहे. मंदिराच्या बाजूस असलेली पुष्करणी ही विशेष खास. मंदिराच बांधकाम १२ व्या शतकात शिलाहारांच्या राजवटीत झालं आहे. कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर आणि या मंदिराची उभारणी समकालीन असल्याचं म्हटलं जातं. हा परिसर इतका मंत्रमुग्ध करणारा आहे की दोन अडीज तास इथं थांबूनही इथून पाय निघत नव्हते. अखेर पुढचा टप्पा गाठण्यासाठी स्थानिकांकडून कन्फर्म करून घेतलेल्या ॲाफबीट वाटेवरून मार्ग काढत पुन्हा हायवे गाठला. या वापर नसलेल्या वाटेवर एका मारूती मंदिराचं ही दर्शन झालं.