कोकणचा विषय निघाला कि आठवण येते ती लांबवर पसरलेला समुद्र,लाटांवर ‘हेलकावणाऱ्या होड्या,सुरुची व माडांची बने,नारळी पोफळीच्या बागा अन डोळे दिपवणाऱ्या हिरवाईने नटलेला निसर्ग,लाल माती,कौलारू घरे, अगत्यशील माणसे जणू स्वर्गातील नंदनवनच इथे अवतरलेले आहे.याबरोबरच हि शांत,व पवित्र भूमी देवांचे निवासस्थान म्हणून ओळखली जाते.कोकणात अनेक कालखंड व प्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी समृद्ध शिल्पकला व स्थापत्यशैलीने थक्क करणारी अनेक मंदिरे आहेत.या मंदिरांच्या निर्मितीमागच्या कथाही तितक्याच सुरस व वैविध्यपूर्ण आहेत.काही दंतकथा तर काही जनमानसात रूढ झालेल्या आख्यायिका आहेत.असेच एक कोकणातील राजापुर तालुक्यामधील एक प्रसिद्ध असलेले देवस्थान म्हणजेच आडीवरेची श्री महाकाली देवीची माहिती घेऊया.
श्री महाकाली देवी :-
श्री महाकालीची चतुर्भुज मूर्ती घडीव काळ्या दगडातील असून ती दक्षिणभिमुखी आहे. गळ्यात माळा,मस्तकावर पंचमुखी टोप,हातात डमरू,त्रिशूळ, तलवार व पंचपात्र आहे. देवीचे पौर्णिमा व अमावस्येला नारळाचे दूध व तेल याने मर्दन करून स्नान घालण्याची प्रथा पाळली जाते. देवीला भक्तांनी १२ किलो चांदी वापरून तयार केलेली मयूरशिबिका
ही पालखी पाहण्यासारखी आहे. नवरात्रांत येथे मोठा उत्सव असतो.तब्बल नऊ दिवस यात्रा आणि शेवटी विजयादशमी साजरी केली जाते.देवीला विविध वस्त्रालंकार आणि आभूषणांनी सजविले जाते.श्री योगेश्वरी, श्री महालक्ष्मी, श्री महाकाली, श्री महासरस्वती आणि श्री रवळनाथ अशा पांच देवतांची मंदिरे इथे आहेत.देवीचे दर्शन घेताना सर्वप्रथम परिसरातील नगरेश्वराचे दर्शन प्रथम घ्यावे, त्यानंतर श्री देवी महालक्ष्मी, श्री देव रवळनाथ आणि त्यानंतर श्री महाकाली आणि महासरस्वतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. या संपुर्ण
परिसराला महाकाली पंचायतन असेही म्हणतात. कोकणातील इतर देवालयांप्रमाणेच श्री महाकालीचे मंदिरही कौलारू आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असून श्री महाकालीची मूर्ती हि अतिशय आकर्षक व सुंदर आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे.नवसाला पावणारी देवी म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे.
वेत्येकरांचा पालखी मान :-
श्री महाकाली देवीच्या चतुर्थ सीमा पालखी दर्शन सोहळ्याचा मान वेत्ये ग्रामस्थांकडे असतो. देवीची पालखी निघण्यापूर्वी देवीची पूजाअर्चा त्यांच्या हस्ते केली जाते. वेत्ये गाव हे देवीचं माहेर असल्यामुळे देवी इथे तिस-या दिवशी येते. पण जुन्या चालीरितीप्रमाणे माहेरात जास्त थांबायचं नसतं, म्हणून तिथे ती जास्त थांबत नाही. गावाजवळच्या देवस्तंभ किंवा स्तंभदेवाच्या ठिकाणी प्रथम १५ मिनिटं थांबते. तिथे गावाचं कल्याण व्हावं, यासाठी वेत्यातील खोत असलेल्या जाधवांकडून परंपरेनुसार गाऱ्हाणं घातलं जातं. त्यानंतर देवीची पालखी गावात जाते.तिथे प्रत्येक घराघरातून सुवासिनी देवीची खणा-नारळानं ओटी भरतात. त्यानंतर देवी कालिकावाडीत जाऊन मग देवळात परतते. पहिल्या दिवशी देवी मोगरे, तिवरे, कोंबे अशा १४ गावांमधून देवीचा प्रवास सुरू असतो. रात्री देवीजवळच्या सत्येश्वराच्या मंदिरात विश्रांती घेते. शेवटच्या म्हणजे तिस-या दिवशी ती मंदिरात परतते.
इतिहास :-
इ.सं. १११३ मध्ये शिलाहार राजवंशातील भोज राजाने दिलेल्या एका दानपत्रात आडिवरे या गावाचा उल्लेख अट्टविरे
या नावाने आढळतो. याचा अर्थ हे गाव त्यापूर्वी पासून अस्तित्वात आहे. आडिवरे येथे शके १२५० म्हणजे इ.सं. १३२४ मध्ये हे महापीठ अस्तित्वात आले. आद्य शंकराचार्यांनी याची स्थापना केली असे मानतात.अशा या प्राचीन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, समर्थ रामदास स्वामींनी भेट देऊन महाकालीचे दर्शन घेतल्याचे पुरावे सापडतात.
दंतकथा :-
आडीवरे या गावात श्री महाकाली देवीचे आगमन कसे झाले या संबंधी मंदिराच्या पुजार्यांनी एक दंतकथा सांगितली ती अशी कि, सुमारे बाराशे वर्षापूर्वी भंडारी कोळी लोक वेत्ये या त्यांच्या समुद्राकाठच्या गावी
नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांचे जाळे अडकून पडले. बरेच प्रयत्न करूनही जाळे वर येईना तेंव्हा त्यांनी जलदेवतेची करूणा भाकली. त्यांच्यापैकी मूळ पुरुषाच्या स्वप्नात येऊन श्री महाकालीने दृष्टांत दिला “मी महाकाली आहे, तू मला वर घे आणि माझी स्थापना कर”. त्याप्रमाणे दुसर्या दिवशी जाळे ओढले असता त्यांना काळ्या पाषाणातील श्री महाकालीची मूर्ती सापडली व त्यांनी दृष्टांताप्रमाणे सर्वांना मध्यवर्ती अशा “वाडापेठ” येथे देवीची स्थापना केली.
कसे जायचे :-
रेल्वेने राजापूर स्थानक गाठावे तेथून खाजगी वाहने व रिक्षा मिळतात.महाराष्ट्र शासनाच्या ST बसने राजापूर बस स्थानक गाठावे.ईथुनही खाजगी वाहने आणि रिक्षा मिळतात.श्री महाकाली मंदिर हे रत्नागिरीपासून ३४ किमी आणि राजापुरपासून २८ किमी अंतरावर आहे.
निवास आणि जेवण व्यवस्था :-
मंदिराच्या विश्वस्त मंडळाने मंदिराच्या शेजारीच भाविकांना राहण्यासाठी ‘भक्त निवास’ बांधलं आहे. इथे गरम पाणी आणि शुद्ध शाकाहारी जेवणाची व्यवस्था आहे.
राजापूर शहरात अनेक हॉटेल व लॉज उपलब्ध आहेत जिथे या दोन्ही सुविधा सहज मिळतात.
जवळची पर्यटन स्थळे :-
कशेळीचा श्री कनकादित्य (सूर्यमंदिर), पूर्णगडचा किल्ला, माडबनचा समुद्रकिनारा, गणेशगुळ्याचा गणपती आणि तेथील रम्य समुद्रकिनारा, सुरूच्या बनातील भाट्ये बीच आणि नारळ संशोधन केंद्र.
कोकणातील एक प्राचीन व अद्भुत देवस्थानाची सफर करायची आहे तर आडीवरेची श्री महाकाली देवी हे राजापूर तालुक्यातील ठिकाण आपल्या लिस्टवर आवर्जून असायलाच हवे…
साभार सूची :- मायबोली,गूगल,राजापूर पर्यटन
संकलन/लेखन
किरण भालेकर