इंदवटीचा लक्ष्मीकांत -ठाणेश्र्वर व हवलीचा कडा धबधबा…

🌳 श्रावणातील अनोळखे पर्यटन 🌳

ऋतुंचा राजा वसंत तर महिन्यांचा राजा श्रावण.श्रावण म्हणजे निसर्गाला पडलेलं सोनेरी स्वप्न.श्रावण म्हणजे निसर्गाचा समृद्ध संकल्प. सृजनाला आवाहन करणारा, कवींना भूरळ घालणारा आनंदधन म्हणजे श्रावण…

कोकणात आषाढात मुसळधार पावसाने अनावर झालेले नदी -नाले श्रावणात पोटापुरते म्हणजे पात्रापुरते जगत असतात.आणि म्हणूनच पावसाळी पर्यटनाला ख-या अर्थाने सुरवात होते ती श्रावणात.श्रावणी सोमवार म्हणजे तर शिवभक्तांसाठी पर्वणी असलेला दिवस.अशा या श्रावणी सोमवारी फिरायला बाहेर पडायचंय…तसेच नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी महादेवाच्या दर्शनाला जायचंय…सोबत धबधब्याखाली मनमुराद भिजायचंय तर लांजा तालुक्यातील निसर्गरम्य इंदवटी गावातील श्री लक्ष्मीकांत -ठाणेश्र्वर मंदिर व हवलीचा कडा धबधबा आपल्या मनातील कल्पित एकदिवसीय सहल नक्कीच पूर्ण करु शकतो. कोकणातील देवस्थानांचे विशेष म्हणजे ती निसर्गरम्य परिसरात वसलेली आहेत.त्यामुळे देवदर्शनाबरोबरच निसर्ग सॊंदर्याचाही आनंद घेता येतो.देवस्थानाजवळ धबधबा असेल तर डबल धमाकाच.रत्नागिरी जिल्ह्यातील मारळचा मार्लेश्र्वर व राजापूरचा धूतपापेश्र्वर ,चाफवलीचा चाफनाथ ही अशीच आध्यात्मिक व निसर्गानूभूती देणारी लोकप्रिय ठिकाणे.पावसाळ्यात व विशेष करुन श्रावण महिन्यात या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते.अशाच प्रकारे लांजा तालुक्यातील मुचकुंदी नदिच्या काठावर वसलेल्या निसर्गरम्य इंदवटी गावातील श्रीदेव लक्ष्मीकांत -ठाणेश्र्वर व हवलीचा कडा धबधबा हा परिसर धार्मिक व पर्यटनदृष्ट्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

श्री देव लक्ष्मीकांत व ठाणेश्र्वर :- इंदवटी गावातील सुतारवाडी पर्यंत डांबरी रस्त्याने जाता येते.येथून पुढे कच्चा रस्ता गोळवशी गावाकडे जातो.या रस्त्याने पुढे जाताच बाईत वाडी स्टाॅप आहे.येथे आपली वाहने थांबवून बाईतवाडी कडे जाणाऱ्या पाखाडीने आपण थेट श्री देव लक्ष्मीकांत व श्री देव ठाणेश्र्वराच्या पवित्र मंदिर परिसरात पोहचतो. गर्भगृह व छॊटेखानी सभामंडप असे मंदिराचे स्वरूप आहे. बाईतवाडीतील श्रीदेव लक्ष्मीकांत इंदवटी, गोळवशी ,खावडी व अर्धा निओशी या साडे तीन गावांचा मानकरी आहे.लक्ष्मीकांत हे विष्णूचे उपनाम.हजार ते बाराशे वर्षापूर्वीची शिलाहार राजवटीतील हे देवस्थान असावे असा प्राथमिक अंदाज बांधता येतो. सुलतानी आक्रमणापासून तेव्हा देवतेच्या मूर्ती वाचवण्यात आल्या त्यातीलच हे एक देवस्थान असावे. काळ्या दगडातील शंख,चक्र, गदा,पद्मधारी घडीव श्री विष्णूची (लक्ष्मीकांत) मूर्ती आहे.मुर्तीच्या डाव्या उजव्या बाजुला जय -विजय हे द्वारपाल असून मूर्तीच्या खालच्या बाजूला गरुड हात जोडून उभा आहे. तसेच त्याच काळातील गणपती शिल्प सुद्धा अजून सुस्थितीत आहे.श्री देव लक्ष्मीकांत या नावाने हे देवस्थान प्रसिद्ध आहे.
मंदिराच्या डाव्या बाजूला श्री देव ठाणेश्र्वराचे घुमटीवजा देऊळ असून आतील मनमोहक शिवपिंड पाहून आपले दोन्ही कर नकळत जोडले जातात.व मुखात हर हर महादेवचा जयघोष सुरु होतो.मंदिराच्या उजव्या बाजूला बारमाही पाण्याचा कुंडस्वरूप झरा आहे.मंदिरामागील छोटेखानी धबधबा आकर्षित करतो.याचा गाज वातावरणात वेगळाच रंग भरतो.नितांत सुंदर व गर्द झाडिमध्ये वसलेल्या या पवित्र स्थळावर श्रावणी सोमवारी पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात भक्तांची मांदियाळी पहायला मिळते.महाशिवरात्र व नवरात्रीला येथे उत्सव भरतो. इंदवटी,गोळवशी,खावडी व अर्धा निओशी यासाडे तीन गावातील कोणतेही शुभ कार्य श्री लक्ष्मीकांताची आज्ञा घेतल्याशिवाय संपन्न होत नाहि.अशा पावित्र्याने भारलेल्या वातावरणात आपण लक्ष्मीकांत व ठाणेश्र्वराच्या चरणी लीन होतो.

लांजा शहरापासून १० कि.मी.अंतरावर मुचकुंदि नदिच्या काठावर वसलेल्या निसर्गरम्य इंदवटी गावात जाण्यासाठी पर्यटकांना कोंडये -निओशी -इंदवटी हा पर्याय उत्तम ठरु शकतो.कारण निओशी गाव सुरु होताच एका बाजूला हिरव्यादाट डोंगररांगा व संथ वाहणाऱ्या मुचकुंदी नदीचे विहंगम दृश्य आपल्याला आकर्षित करते.हा सुंदर परिसर न्याहाळत आपण इंदवटी गावात कधी पोहचतो ते लक्षातच येत नाही. मुचकुंदी नदीवर लघुपाटबंधारे धरणप्रकल्प पुर्णत्वास गेला हे.गावातील जलसिंचनासाठी महत्वपूर्ण ठरणारा हा प्रकल्प असून इंदवटी गावातील भगते वाडी परिसरात या धरणाचा सांडवा बांधलेला असून या सांडव्यावरून धरणाचा नयनरम्य परिसर पाहता येतो.पावसाळी पर्यटकांसाठी हे ठिकाण देखील लोकप्रिय ठरत आहे.रस्त्यालगत असणाऱ्या भातांच्या हिरव्यागार खेच-यांमध्ये श्री धावबाचे मंदिर सुंदर आहे

हवलीचा कडा धबधबा :
देव श्री लक्ष्मीकांत या प्राचीन मंदिरापासून १५ मिनिटांच्या अंतरावर असलेला हा धबधबा हवलीचा कडा या नावाने स्थानिकांमध्ये परिचित आहे. बाईत वाडितील स्थानिक मार्गदर्शकाच्या मदतीनेच हवलीचा कडा गाठावा. धबधब्याकडे जाताना भोवताली असलेली गर्द जंगलराई, भाताची हिरवीगार खाचरे, नारळी पोफळीच्या बागा लक्ष वेधून घेतात. डोंगर उतारावरील हि भाताची हिरवीगार खाचरे केरळमधील चहाच्या मळ्यांची आठवण करुन देतात.देहभान हरवत यातून मार्ग काढत आपण धबधब्याजवळ पोहचतो.हा पांढराशूभ्र फेसाळणारा धबधबा पाहिला की,अंगातला क्षीण क्षणार्धात निघून जातो.


२५ फुटावरुन हवलीचा कडा धबधबा कोसळताना होणारा नाद एकीकडे धडकी भरवणारा असतो तर दुसरीकडे खडकावर आपटुन उडणा-या पाण्याच्या तुषारातुन तो तुम्हाला परमोच्च सुखाच्या आनंदाने न्हाऊ घालतो.पाण्यात उतरताना पुरेशी काळजी घेतली की, धबधब्याखाली यथेच्छ भिजण्याचा मनमुराद आनंद घेता येतो.धबधब्याच्या वरती अनेक गोलाकार रांजण खळगे पाहण्यासारखे आहेत उन्हाळ्यात या कुंडांमध्ये अंघोळीची मज्जा काही औरच असते.हा ओसंडून वाहणारा शुभ्रधवल धबधबा पाहून मुखातून या काव्यपंक्ती आपसुक बाहेर येतात.


आले भरुन गगन
पावसाचे हे स्पंदन
हर्ष वाहे ओसांडून
झरे नसानसातून ..
आला श्रावण ,श्रावण।।

एकूणच या दोन्ही ठिकाणी भेट देण्यासाठी पावसाळा हा ऋतु सर्वोत्तम कालावधी असुन श्रावणी सोमवारी महादेवाचे दर्शन व धबधब्याखाली चिंब भिजून निसर्गाचे संगीत तना -मनात भरुन उत्साहाने परतता येते.वर्षासहलीचा व श्रावणाचा सर्वार्थाने आनंद उपभोगण्यासाठी लक्ष्मीकांत- ठाणेश्र्वर मंदिर परिसर व हवलीचा कडा धबधबा परिसर इंदवटी ला एकदा तरि भेट द्यायलाच हवी.

कसे जाल? 🚙🚍🛵
🛣️लांजा – कोंडये – निओशी -इंदवटी

🛣️ लांजा -कुवे- वनगुळे -इंदवटी

🛣️लांजा – कोंडये- गोळवशी – इंदवटी.

🌳⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️🌳
श्री.विजय हटकर
मुक्त पत्रकार, ब्लाॅगर.


विशेष सहाय्य ;-
किरण भालेकर,अनिकेत भगते ,साहील बाईत.

श्री देव लक्ष्मीकांत प्रसन्न
देव ठाणेश्वर
हवली कडा धबधबा
लेखक श्री.विजय हटकर
नैसर्गिक झोपाळा…
निसर्गरम्य घनदाट जंगलाने नटलेला परिसर
मुचकुंदी माई
इंदवटी धरण
श्री देव धावबा मंदिर

2 thoughts on “इंदवटीचा लक्ष्मीकांत -ठाणेश्र्वर व हवलीचा कडा धबधबा…”

  1. Atishayyy sundarr ahe amcha gaav ❤️
    Khup bara vatla gharatun gaavache darshan ghadle 😍 thank you sir !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *