भीमाशंकर ट्रेक -पृथ्वीवरचा स्वर्ग…

भीमानदीचे उगम स्थान असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर हे देशातल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी ६ वे ज्योतिर्लिंग आहे.समुद्र सपाटी पासून अंदाजे ३५०० फूट उंचीवर असलेले भीमाशंकर हे पवित्र देवस्थान घनदाट जंगलाने वेढलेले आहे.पश्चिम घाटातील या जंगलाची १९८४-८५ साली अभयारण्य म्हणून घोषणा करण्यात आली.


घनदाट वनश्रीने सजलेल्या भीमाशंकरचा ट्रेक सफर सह्याद्री ट्रेकर्स कडून १३-१४ जुलै आयोजित करण्यात आला होता.मागचे सलग चार रविवार ट्रेक आणि मित्रांसोबत भटकण्यात गेल्याने या ट्रेक ला घरून थोडा विरोध होत होता. खुप वाचले, ऐकले होते भीमाशंकर बद्दल आणि ते सर्व मला अनुभवायचेही होते.म्हणून पुढच्या रविवारी नक्की घरी राहतो हे आश्वासन (खोटं) देऊन घरच्यांचा विरोध कमी केला आणि ट्रेक ची तयारी सुरू केली.


शनिवार १३ जुलै ला रात्री ११.३० ला कर्जत स्टेशन ला भेटायचे ठरले होते.या ट्रेक ला मुंबई,ठाणे, पुणे,वलसाड(गुजरात) मधुन भटके येणार होते. ठरल्या प्रमाणे आम्ही सर्व ४२ पुरुष आणि १ महिला शक्ती रात्री १२ वाजता कर्जत स्टेशन ला जमलो.कर्जत स्टेशन पासून खांडस गावा पर्यत जाण्यासाठी सफर सह्याद्री कडून बसची व्यवस्था करण्यात आली होती. खांडस गावामधून भीमाशंकर ला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.पहिला गणेश घाट आणि दुसरा शिडी घाट.आमची बस निघाली,भीमाशंकरसाठी आमचा प्रवास सुरु झाला होता. हा ट्रेक जेमतेम १० ते १२ तासांचा असल्यामुळे मी बस मध्ये थोडा आराम करायचे ठरवले. काहीजण आराम करत होते तर काहींच्या गप्पा रंगल्या होत्या.आमचे ब्लॉगर विनायक परब हे आपल्या ब्लॉगसाठी व्हिडीओ तयार करत होते. कर्जत ते खांडस या एक ते दीड तासाच्या प्रवासात मी एक डुलकी घेतली. रात्री १.३० च्या सुमारास आम्ही खांडस गावात पोहचलो आणि इथून आमचा ट्रेक सुरू होणार होता.ट्रेक सुरू होण्यापूर्वी सर्वांची ओळख परेड झाली. मिलिंद सरांनी ट्रेक विषयी सुचना केल्या आणि आमचा भीमाशंकर चा तंगडतोड ट्रेक रात्री २ च्या सुमारास सुरू झाला. नाईट ट्रेक असल्याने चढताना गणेश घाट मार्गे जायचे ठरले. सर्वानी स्वतःजवळ असलेल्या बॅटरी चालू केल्या आणि हर हर महादेव,गणपती बाप्पा मोरया म्हणत चालायला सुरुवात केली.पहाटे ५ पर्यंत आम्हाला पदरवाडी या भीमाशंकर च्या जंगलात मध्य भागी वसलेल्या गावी पोहचायचे होते.पदरवाडीतच आमच्या चहा नाष्टा ची व्यवस्था करण्यात आली होती.


ढगाळ वातावरण, मधेच पावसाची एक सर आणि हवेतला थंडावा मनाला सुखावत होते.या वातावरणात आमची पाऊले पदरवाडीच्या दिशेने पडू लागली.जस जसे जंगलात शिरत गेलो तस तसे जंगल घनदाट होऊ लागले.गणेश घाटातून जात असताना थोड्या अंतरावर एक गणेश मंदिर आहे. सुमारे ३० ते ४० मिनिटं चालल्यावर आम्ही या मंदिरात पोहचलो. सर्वानी मंदिरात थोडा वेळ आराम केला.क्षणभर विश्रांती करून बाप्पाचे नाव घेउन पुन्हा प्रवास सूरु झाला.या पुढचा प्रवास हा घाट चढणीचा होता.धनगराच्या मेंढी सारखे आम्ही एका मागुन एक हळूहळू घाट चढून एका पठारावर आलो.येथे परत थोडा वेळ आराम करून सुखलेला घसा ओला केला (पाणी पियुन).सफर सह्याद्री चे सुरक्षा शिलेदार अमर ने सर्वाना सर्वाना लिंबाच्या गोळ्या दिल्या, सोबत कागद कागद खाली टाकू नका असा दम ही भरला. एवढ्यात किरण ने शेवटची टीम कुठं पर्यंत पोहचली याची चौकशी करण्यासाठी तुषारशी walkie talkie वर संपर्क केला.तेव्हा समजले की आमच्या सोबत आलेले adv.विजय पांडव यांना घाट चढताना त्रास सुरू झाला आहे. या स्थितीत त्यांना तिथे सोडणं शक्य नव्हते आणि परत खांडस ला घेऊन जाणे सोयीस्कर नव्हतं. त्यांना थांबत थांबत वरती पदरवाडी पर्यंत आणावं लागणार होते. तुषार त्यांची योग्य ती काळजी घेत होता.त्यांच्यासाठी एनर्जी ड्रिंक ची पण व्यवस्था करण्यात आली होती.आता सर्व adv. विजय सरांच्या ईच्छाशक्तीवर अवलंबून होते.सफर सह्याद्री आपल्या सोबत आलेल्या भटक्याला अर्धवट सोडत नाही याचा अनुभव मी भैरवगड ट्रेक ला घेतला होता.थोडा दम घेऊन विजय सर पुन्हा चालायला लागले. तुषार होताच त्यांच्या सोबत.थोड्या वेळातच adv. विजय पठारावर पोहचले. या पुढचा प्रवास(पदरवाडी पर्यंतचा) जास्त चढिचा नव्हता. पुन्हा आम्ही सर्व चालायला लागलो.
वाटेत गावातील लोकांनी बांधलेली झोपडी स्वरूपी दुकानं दिसू लागली.त्या झोपड्यांमध्ये विश्रांती घेत घेत आम्ही पुढे जात होतो.अशाच एका झोपडीत विश्रांती घेण्यासाठी आम्ही थांबलो.सर्वजण एक लाकडी ओट्यावर बसलो आणि अचानक ओट्याने जीव सोडला, ओटा तुटला आणि मिलिंद सरांच्या पायाला मार लागला.त्यांचा पाय तुटलेल्या ओट्याखाली आला होता.किरण ने त्यांना प्राथमिक उपचार दिले आणि मार किती लागला ,जखम झाली आहे का याची पाहणी केली.”मला जास्त लागले नाही i am all right” असे म्हणत मिलिंद सरांनी पुन्हा ट्रेक सुरू केला. थोड्याच वेळात आम्ही पदरवाडीला पोहचलो.सुमारे ५.३० वाजले होते.अगोदरच काही ट्रेकर्स ग्रुप आल्यामुळे आम्हाला फारशी जागा उपलब्ध नव्हती. सर्वानी मिळेल त्या जागेत जमेल तसा आराम केला.अर्धा तास आराम करून चहा नाश्ता घेऊन परत ट्रेक ला सुरवात होणार होती.मी पण अर्धा तास झोप काढली.
आता सकाळचे ६ वाजले होते. अमर ने मला चहा नाश्तासाठी उठवले.डोळे उघडताच समोर दर्शन झाले ते भीमाशंकराच्या भव्य जंगलाचे. जंगलातली सकाळ खरच खुप देखणी असते.मन प्रसन्न झाले आणि नाश्ता करून पोटही.गरमागरम पोहे सोबत गवती चहा, जंगलातली हिरवळ आणि पावसाची रिपरिप माझ्या स्वप्नातली सकाळ आज उजाडली होती.हिरव्या रंगात न्हालेले जंगल पाहताच मन चिंब झालं होते.वाह!मस्तच!
सकळी ६.३० ला पदरवाडी ते भीमाशंकर असा प्रवास सुरु झाला.या पुढचा प्रवास खुप खडतर आणि दमछाक करणारा होता. सरळ सरळ भीमाशंकरच्या डोंगराला भिडायचे होते. adv.विजय यांनी पदरवडीतच थांबायचा निर्णय घेतला.बाकीच्या सर्वांचा खडतर प्रवास सुरु झाला.


संपूर्ण डोंगरावर धुक्याची चादर पसरली होती.पक्षांचा किलबिलाट सुरू होता.निरनिराळ्या पक्षांच्या आवाजाचा वेध घेत आमची पावले पुढे पडत होती. हे सर्व सौन्दर्य मनाला भुरळ घालत होतं.
हा खडतर प्रवास पण आता संपत आला होता.सुमारे दीड तासाच्या खडतर प्रवासानंतर आम्ही भीमाशंकरच्या शेवटच्या पठारावर पोहचलो. इथून भीमाशंकर देवस्थान १५ ते २० मि.च्या अंतरावर होते.बाकीचे सर्व पठारावर येई पर्यंत पाठरावरच थांबायचे होते. पाठरावरच्या एका झऱ्यातून थंडगार पाण्याचे दोन घोट पियुन मन तृप्त झाले, तहान भागली.आता सर्वांची फोटोग्राफी सुरू झाली.एवढ्यात आमच्या सोबत आलेल्या पुणे पोलिसात कार्यरत असलेल्या हेड कोन्स्टेबल श्री. नितिन काकडे सरांनी आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असलेला तिरंगा बाहेर काढला आणि आमच्या सर्वांचा थकवा क्षणातंच निघून गेला.तिरंगा पाहताच सर्वांमध्ये आपसूकच जोश भरला. सर्वांचे चेहरे प्रसन्न झाले.जंगलाचे सौन्दर्य तिरंग्यामुळे अजुनच फुलुन गेलं होतं. सोबत नितिन सरांनी महाराष्ट्र पोलिसांचा ध्वजही आणला होता. सर्वानी राष्ट्रध्वज आणि महाराष्ट्र पोलीस ध्वजा सोबत फोटोशूट केले.अभिमानाने फुललेले चेहरे घेऊन आम्ही श्री क्षेत्र भीमाशंकरच्या प्रवेशद्वारापाशी आलो.संपुर्ण भीमाशंकर परिसर धुक्यात लपला होता.हर हर महादेव म्हणत आम्ही मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या उतरू लागलो.काही मिनिटांत आम्ही मंदिराजवळ पोहचलो.सकाळी लवकर आल्यामुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी जरा कमीच होती.हर हर महादेव, ओम नमः शिवाय म्हणत आम्ही मंदिरात प्रवेश केेला.
भीमाशंकराचे मंदिर हे हेमाडपंती पद्धतीचे असून सुमारे १२०० ते १४०० वर्षा पूर्वीचे आहे. गाभाऱ्यातील स्वयंभु शिव पिंडी चे दर्शन घेऊन आम्ही पुढचा प्रवास सुरु केला.
येथून आम्हाला गुप्त भीमाशंकर या ठिकाणी जायचं होते.भीमाशंकर मंदिरापासून साधारण १.५ किमी वर “डाकिणीचे” वण या भागात गुप्त भीमाशंकर हे स्थान आहे. भीमा नदीचा मुळ उगम ज्योतिर्लिंगात आहे.परंतु ती तेथून गुप्त होऊन जंगलात १.५ किमीवर उगम पावते.भीमा नदीच्या या उगमस्थानाला गुप्त भीमाशंकर म्हणुन ओळखले जाते.सोलापूर जिल्ह्यातुन श्री क्षेत्र पंढरपूरला आल्यावर भीमेचे पात्र चंद्रकोरीच्या आकाराचे दिसते त्यामुळे तेथे ती चंद्रभागा म्हणुन ओळखली जाते.सुमारे अर्ध्या तासाच्या पायपीट नंतर आम्ही गुप्त भीमाशंकर या ठिकाणी पोहचलो. भिमानदीचे उगमस्थान आणि खळखळत तुफान होऊन वाहणाऱ्या धबधब्याचे नयनरम्य चित्र पाहून परत पदरवाडीच्या दिशेने निघालो.


परतत असताना भीमाशंकर मंदिरा जवळ आम्हाला एक सुखद धक्का मिळाला.
adv. विजय पांडव जे पदरवाडीत थांबले होते.ते आम्हाला मंदिराजवळ भेटले. शेवटी सरांनी आपला ट्रेक पूर्ण करण्याचा दृढनिश्चय सोडला नाही आणि ट्रेक पूर्ण केला.मंदिराजवळून मिलिंद सर आणि नितिन काकडे सरांनी आमची रजा घेतली.आणि उरलेली सर्व मंडळी पदरवाडीच्या दिशेने निघालो.भुकेने व्याकुळ झालेले आम्ही सर्व झपाझप वाटा तुडवत, न थांबता,न विश्रांती घेता तासाभरात पदरवाडीला पोहचलो.(भुकच तेवढी लागली होती.)
पहिली पंगत शाकाहारी मंडळींची बसली. कारण चिकन अजून तयार झाले नव्हतं. मी ही शाकाहारी जेवण जेवलो. आणि बाहेर बसुन थोडा आराम केला.आराम करणे पण गरजेचं होतं कारण उतरताना शिडी घाटातून थरारक पद्धतीने उतरायचे होते.


ग्रुप लीडर किरण ने शिटी वाजवली, सफर सह्याद्रीचे टेक्निकल हेेेड अमर सर शिडी घाटाच्या मार्गाने निघाला त्याच्या मागुन आम्ही सर्व निघालो. एकमेकांना सहकार्य करत आम्ही उतरु लागलो .जस जसे खाली उतरत होतो तस तसा थरार वाढत होता.एक चुकीचे पाऊल खुप महागात पडणार होते. लांब श्वास घेत एकमेकांच्या मदतीने आम्ही उतरत होतो.मोबाईल मधल्या गेम सारखी आमची अवस्था झाली होती पहिल्या लेव्हल नंतर दुसरी लेव्हल अजून अवघड होत होती.
या सर्व थरारात विशेष उल्लेख करावा लागेल तो म्हणजे आमच्या सोबत असलेल्या एकमेव महिला शक्तीचे. त्या ताई चे नाव चैताली किंव्हा चित्राली असावे.नक्की नाव माहित नाही. असो नावात काय आहे?ही ताई संपुर्ण स्त्री जातीचे प्रतिनिधित्व करत होती. एका पुरुषालाही लाजवेल असा ताईचा उत्साह आणि जोश होता .संपुर्ण ट्रेक मध्ये तो कायम होता.ताईला एक सलाम तर बनतोच.
थरार आणि निसर्गाच्या विहंगम नजाऱ्याने शिडी घाटाचा अनुभव काही वेगळाच,जसे स्वर्ग इथेच आहे.शिडी घाटाचा थरार संपला आता आमची पावले खांडस कडे चालू लागली. काही वेळातच आम्ही खांडसला पोहचलो. बस पण वेळेत आली होती. सुमारे १२ तास चाललेला हा ट्रेक आता संपला होता.


सफर सह्याद्री चे नियोजन,शितबद्धता आणि सुरक्षा हे तीन नियम आहेत आणि सफरसह्याद्री कडुन ते कटाक्षाने पाळले जातात.


” सफरसह्याद्री है तो डर किस बात का?”
किरण, तुषार आणि अमर तुमचे सर्वांच्या वतीने खुप खुप आभार.तुमची लिडर क्वालिटी खरंच खुप ग्रेट आहे..

शेवटी सर्वाना एकच विनंती
जंगलात भटकंती करताना आपण पशुपक्ष्यांच्या भागात आलेलो असतो. त्यामुळे त्यांना त्रास होणार नाही, इजा होणार नाही याची काळजी आपणच घ्यायची आणि थोडं जबाबदारपणे वागलं तर तिथल्या निसर्गाचा मनमुरादपणे आनंद घेता येतो.
भेटूया लवकरच!

जय शिवराय!

निकेतन आडिवरेकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *