छत्रपती शिवाजी महाराज -गुणविशेष …

|| “शिवरायांसी आठवावे,जिवीत तृणवत मानावे,इहलोकी परलोकी उरावे कीर्तीरूपे ||

पन्नास वर्षाच्या दैदिप्यमान कारकिर्दीनंतर जगात सर्वोत्तम गणला गेलेला एक महान राजा इथेच आपल्या आवडत्या जागी निजला.छत्रपती शिवाजी महाराज कोणी देव न्हवते ते सुद्धा मनुष्यच होते.पण त्यांच्या अंगी अलौकिक असे गुण होते व या गुणांमुळेच पुढे ते अजरामर झाले आपण त्यांना देवाच्या जागी मानतो तो आदराचा भाग आहे पण अभ्यास करताना किंवा महाराज समजून घेताना त्यांना एक उत्कृष्ट प्रशासक,लोककल्याणकारी राजा म्हणूनच बघितले पाहिजे असे मला वाटते. महाराजांनी नुसती स्वप्ने बघितली नाहीत त्यांनी कार्याला महत्व दिले (कर्म)त्यासाठी अहोरात्र कष्ट केले व ती स्वप्ने सत्यात उतरविली राज्याभिषेक हे याच स्वप्नांचे फलित होते.

महाराजांच्या अंगी असणाऱ्या उज्वल गुणांची उजळणी करूया….

1)लोकसंग्रह व औदार्य :-
स्वराज्य स्थापन करण्यास बालवयात सुरुवात करतानाच महाराजांनी बारा मावळातले सवंगडी जमवले व त्यांना विश्वास देऊन हे कार्य त्यांचेच आहे हे ठसविले.त्यांचे बोलणे मधुर व विश्वासपूर्ण होते त्यामुळे लहान वयातच त्यांच्याकडे लोकांचा संग्रह वाढला आणि विश्वासू व स्वामिनिष्ठ सेवकांची त्यांना कधीही कमी पडलेली नाही.लोकसंग्रह जमविण्यासाठी औदार्य हा गुण लागतो.आपल्या लोकांनी चांगली कामगिरी केली असता ते अशा शाबासकी देण्यास सदैव तत्पर असत.तसेच मावळ्यांचे वेतन वेळच्या वेळी देणे,संसारात अडचणीच्या वेळेत त्यांना मदत करणे,युद्धात घरातील कर्ता पुरुष दगावल्यास त्याच्या पाठी संपूर्ण कुटुंबाचा चरितार्थ चालेल हि व्यवस्था करण्यात ते तत्पर असत.

2)गुणज्ञता व निःपक्षपातबुद्धी :-
लोकसंग्रह करणारा हा गुणांची पारख करणारा असला पाहिजे.गुणांची पारख करून योग्य ती कामगिरी योग्य व्यक्तीला सांगावी व योग्यतेच्या मानाने त्या व्यक्तीची बढती करावी हे राजांचे तत्वच होते.हा आपला मित्र आहे याला मोठी कामगिरी द्यावी व इतरांना छोटी कामगिरी द्यावी असा पक्षपात महाराजांनी कधी केलेला दिसत नाही.कोणालाही एखादे काम सोपवल्यावर ते त्यावर पूर्ण भरवसा टाकत व त्याआधी तो भरवसा टाकण्यायोग्य आहे का याची पाहणी करत व नंतरच कामगिरी देत असत त्यामुळेच लोकांच्या ठायी इमान,स्वामीनिष्ठा या गुणांचा विकास होत गेला.

3)निष्कपटीपणा व मित्रभाव :-
ज्यावर एकदा भरवसा टाकला त्याच्याशी ते कधी कपटाने वागत नसत.आपण योजलेले बेत व करावयाचे उपाय याविषयी ते आपल्या विश्वासू कामदारांशी बोलत असत त्यांची काय मसलत आहे ते आदरपूर्वक ऐकून घेत असत.कोणाशीही दिमाखाचे व गर्वाचे वर्तन करत नसत.आपल्या हाताखालचे लोक मित्रासमान आहेत असे समजून ते त्यांच्याशी स्नेहभाव वर्तत असत.

4)जरब :-
महाराज आपणाशी स्नेहाने वागतात एवढ्यावर जाऊन कोणी कारभाऱ्याने शिरजोर होऊन पाहिले व कामात कुचराई केली तर त्यास गय होत नसे.मग तो कितीही मोठा असला जवळचा असला तरीही त्यास योग्य ते शासन होई व यात कदापी कुचराई होत नसे.यामुळेच त्यांचा दरारा सर्वांमध्ये कायम राहत असे…

5)उद्यमशिलता :-
रणभूमीवर शत्रूशी लढताना आपल्या सैनिकांस शत्रूच्या तोंडी देऊन स्वतः कुठेतरी सुरक्षित राहून प्रेक्षकांप्रमाणे उभे राहण्याचा कित्येक राजे व सेनापती कल असतो तसे महाराजांनी केले नाही.हाती समशेर घेऊन रणात ते सर्वांपुढे असत त्यामुळे मावळ्यांना अधिक जोश येऊन ते पराक्रमाची शर्थ करत असत.आळशासारखे स्वस्थ बसून राहणे त्यांच्या ठायी न्हवते.ते सर्वकाळ कुठल्या न कुठल्या मोहिमेत गुंतलेले असत.अविश्रांत परिश्रमांमुळे त्यांनी आपणांवर कोणत्याही सेनापती व सरदाराची मात्रा चालू दिलेली दिसत नाही.त्यांच्या नंतरच्या काळात याचे उलट चित्रण दिसते.असाच प्रकार किल्ल्यांचा बंदोबस्त,जमीनमहसुल अशी अनेक कामे करण्यात त्यांनी आपले कारभारी सदैव गर्क ठेवत त्यामुळे कारस्थाने करण्यास कोणास सवड मिळत नसे.

6)कल्पकता :-
हा गुण त्यांच्या अंगी नसता तर त्यांस स्वराज्यस्थापनेची बुद्धी कदापी सुचली नसती कारण यवनी अंमलात दहा हजारी, वीस हजारी सरदार नांदत असता त्यांना हि स्वराज्यस्थापनेची बुद्धी का बरे सुचली नसेल..?स्मरणशक्ती व विवेकशक्ती महाराजांच्या चरित्रात लहान वयापासून वेळोवेळी दिसून येते.लहानपण पासूनच त्यांची बुद्धी अतितीव्र होती सर्व प्रकारची माहिती मिळवण्याचा त्यांचा हव्यास अमर्याद होता.

7)तेजस्विता व स्वाभिमान :-

औरंगजेब बादशहाच्या तावडीत सापडले असताना सुद्धा तेथे झालेली मानखंडना त्यांना बिल्कुल सहन झाली नाही व भर दरबारात त्यांनी बादशहाला खडे बोल सुनावले होते. खरे वीर पुरुष असतात त्यांचा हा महाभूषणप्रद गुण होय.शौर्य,विरता, साहस या नैतिक गुणांमुळेच महाराज प्रसिद्धीस पावले.तेजस्वी पुरुष आपली तेजोहानी होण्यासारखी असते ते सर्वप्रकारे टाळून वास्तविक तेज वृध्दीगत होईल ते करण्यास सर्वदा तत्पर असतो.या कसोटीवर महाराज पुरेपूर उतरतात.

8)स्वप्रजावात्सल्य :-
शेतकरी,व्यापारी व उदमी यांचा उत्कर्ष व्हावा त्यांस कोणाकडून उपद्रव होऊ नये,त्यांना योग्य न्याय मिळावा ह्यासाठी राज्याची सुव्यवस्था लावण्यास ते सर्वदा झटत राहिले.कोणत्याही नृपतीस न सुचलेली अष्टप्रधान व्यवस्था त्यांनी निर्माण केली ती केवळ राज्यकारभार साठी नव्हे तर रयतेस सुख लाभावे यासाठी देखील होती.

9)व्यावहरिक वर्तन :-
गुणी व्यक्तींना योग्य वेतन देऊन ते आपल्या पदरी ठेवून घेत असत.कोणीही विद्वान पुरुष आला तर त्याची योग्य संभावना करण्यास सदैव तत्पर असत.त्यांचा पोशाख अत्यंत साधा व राहणीमान अत्यंत साधे असे.त्यांना कोणतेही व्यसन नाही.

10)कौटुंबिक वर्तन :-
महाराजांच्या ठायी मातृपितृभक्ती बंधुप्रेम किती होते हे आपल्यास विविध उदाहरणांवरून स्पष्ट होते.
शहाजी राजांच्या सुटकेसाठी कोंढाणा देणे असो किंवा बंधू संभाजी यांच्या हत्येला जबाबदार अफजलखानाचा सूड व शहाजीराजांना दगाबाजीने पकडलेल्या बाजी घोरपडे सारख्या मातब्बर सरदार स्वतःच्या हाताने वध केला होता.मातोश्री जिजामाता साठी रायगडपायथ्याला पाचाड वाडा बांधून देणे किंवा सती न जाण्याबद्दल विनवणे असे असंख्य दाखले मिळतात.

11)धर्मनिष्ठा व धर्माभिमान :-
स्वधर्मभिमान महाराजांना बालवयापासूनच होती व त्याचे वर्धन वयमानाने अधिक होत गेले.कर्नाटकात मोहिमेस चालले असता मल्लिकार्जुन देवस्थानसमोरच देहत्याग करण्याचा विचार त्यांचा मनात उत्पन्न झाला होता.देवस्थान व धर्मग्रंथ यांचे अध्ययन सतत सुरू असे यामुळे कारभारी लोकांना कधी भीती वाटे की महाराज आता राज्यकारभार सोडून देतात की काय एवढे ते या कार्यात मग्न होत असत.

वरील सर्व गुण हे गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर यांनी लिहिलेल्या शिवचरित्रातील आहेत माझ्या मनीचे नव्हेत हे इथे एवढ्याचसाठी देत आहे कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी असणाऱ्या गुणांचे आपण सर्वांनी अवलोकन करून ते आपल्या अंगी बाणवावेत योग्य कार्य करण्याचा यत्न करावा व हा मनुष्यदेह सार्थकी लावावा…

संकलन
किरण प्रकाश भालेकर
सफर सह्याद्री ट्रेकर्स,मुंबई

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *