सर्व दुर्गवेडे,डोंगरभाऊ यांना मानाचा मुजरा…
“माझ्या आयुष्यात आलेला ढाक बहिरी ट्रेक हा कधीच विसरू शकत नाही.सह्याद्रीचे कितीही वर्णन केलं तरी या विश्वातील शब्दही अपुरे पडतील असा हा स्वर्ग हे प्रवासवर्णन माझ्याच शब्दांत खाली मांडत आहे चुकभुल देणेघेणे चला तर मग निघुया ढाक बहिरीच्या वाटेवर….
|| अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा…||
महाराष्ट्राची ही भूमी शौर्याची, त्यागाची, बलिदानाची आणि स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांची आहे. सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्रात आकाशाशी स्पर्धा करणारा सह्याद्री म्हणजे उदात्त मराठी मनाच्या महत्वकांक्षेचे प्रतीक आहे.आणि याच सह्याद्रीत लपलेल्या दुर्गम स्थानाची माहिती आपल्यासमोर ठेवत आहे.
“महाराष्ट्रातील लोणावळ्याच्या उत्तर दिशेला दहा मैल अंतरावर राजमाची आहे. त्या सभोवताली असलेल्या घनदाट अरण्यात “बहिरी डोंगरावर ढाकचा किल्ला उभा आहे. तो किल्ला म्हणजे दक्षिणोत्तर पसरलेला अजस्त्र डोंगर आहे. ढाकचा बहिरी याचा अर्थ ढाकचा किल्ला.या किल्ल्याला ‘गडदचा बहिरी’ असेही म्हणतात. गडद या शब्दाचा अर्थ गुहा. त्या किल्ल्यावर कातळाच्या पोटात खोदलेल्या पश्चिमाभिमुख गुहा आढळतात.”सुप्रसिद्ध लेखक सर्व ट्रेकर्स चे मार्गदर्शक श्री गो.नी.दांडेकर यांच्यामुळे ढाक बहिरी प्रकाशझोतात आला.ट्रेकला जाण्यापूर्वी सफर सहयाद्री संस्थापक किरण भालेकर यांच्याकडून माहिती घेतली आणि अखेर २८ जून २०१९ हा दिवस निश्चित झाला.
दोन दिवस अगोदरच कर्जत माणगावचे मित्र गणेश घोलप याला सांगितले की,आम्ही ढाक बहिरी ट्रेक करायला येत आहोत तेव्हा तोसुद्धा ताबडतोब तयार झाला.२८ जून रोजी सकाळी ६.०० वाजता निघून कर्जत सांडशी गावात एका स्थानिक रहिवासी यांच्या घरासमोर अंगणात वाहन उभे केले.तेथेच मस्तपैकी गरम गरम कांदापोहे या हक्काच्या पदार्थावर ताव मारून दुपारचे जेवण सांगितले.ढाक बहिरी पायथ्याच्या या सांडशी गावात अनेक ठिकाणी भटक्यांची चहानाश्ता आणि जेवणाची सोय उत्तम होते.अधिक जास्त वेळ न दवडता गावातूनच भटकंतीला सुरुवात केली.गेले दोन महिने पाऊस नसल्याने वातावरण तप्त झाले होते,पण आज सकाळपासूनच रिमझिम हजेरी लावल्यामुळे मन अगदी आनंदून गेले.जसं गाव सोडून जंगलातील पायवाटेने निघालो तस वातावरणातील गारवा वाढत होता.ट्रेक अत्यंत बिकट,उभी थकवणारी चढाई,निर्मनुष्य वाट,घनदाट वृक्षराजीने भरलेले गर्द जंगल यामुळेच सोबत वाटाड्या असने अत्यावश्यक होते,आकाश गोडीवले,प्रसाद जाधव,शरद मालकर,आमचे मित्र आणि या ट्रेकसाठी गाईड गणेश घोलप,विकी मोरे,जयवंत राऊत असे एकूण ९ जण माझ्यासोबत होते.गणेशनी आणलेली भाजी सोबत मिरचीची झणझणीत चटणी व भाकर आणली ती केवळ अप्रतिम होती.जसं श्रीकृष्णाला मित्र सुदाम्याने आणलेले पोहे तसे गणेशने आणलेली न्याहरी अमृत मानून त्याचा मनसोक्त आस्वाद घेतला.पोटपूजा आटपून पुढील ट्रेकला सुरुवात केली,ढाकचे जंगल अत्यंत घनदाट झाडीचे असल्याने सावकाश आम्ही पुढे पुढे चाललो होतो.सोबतीला गावातून भटकंतीचे साथी इमानी जीव ३ कुत्रे आले होते,एवढ्या उंचीवर ते आले होते ते विशेष अगदी कुठेही न थांबता अवघड वाटेतून, आमच्या सोबत एखाद्या ट्रेकर्स सारखे ते चालत होते हे विशेष. जवळपास अडीच तासापेक्षा जास्त चालल्यावर ढाक बहिरीची गुहा नजरेच्या पट्टामध्ये दिसत होती. समोर आ वासून उभा असलेला कातळकडा जीवाचा थरकाप उडवीत होता. त्यात अचानक मुसळधार पाऊस कोसळू लागला त्यामुळे पुरता गोंधळ उडाला. रेनकोट असूनही अंग पार ओलेचिंब होऊन गेले. सह्याद्रीतल्या पावसासमोर रेनकोट तो किती वेळ तग धरणार…!
अशा ठिकाणी आम्ही उभे होतो की,बॉलिवूडचे हॉरर मूव्हीज बनवणारे दिग्दर्शक आठवले ही खतरनाक जागा होती की एखादी मुव्हीज सहज तयार झाली असती.सभोवताली घनदाट अरण्य,दाट धुके आणि मुसळाच्या धारांसारखा बरसणारा पाऊस सर्वजण झाडाचा आसरा घेऊन तिथेच थांबून पाऊस जाण्याची वाट पाहत होतो.समोरच एक भैरवनाथची मूर्ती होती.मूर्ती समोर असंख्य लहान-मोठे त्रिशूल जमिनीत उभे असल्याने काही क्षण असं वाटलं नक्की आपण कुठे आहोत.पावसाचा जोर वाढतच चालला आणि ज्या ठिकाणी उभे होतो त्या ठिकाणी जेमतेम सभोवताली दहा ते पंधरा फूट मोकळी जागा असावी,बाकी सगळीकडे गच्च झाडी बाजूला हिरव्या आंब्याचा पेर पडला होता पाहिले तर आंब्याचे झाड कुठेच दिसत नव्हते मग हे आंबे आले कुठून?.नाना शंकांनी मनात विचाराचे काहूर माजवले भीती अधिकच गडद झाली.पण देवाच्या ठिकाणी अपवित्र गोष्टी घडत नसतात कारण तिथे सकारात्मक ऊर्जा नांदत असते.आम्ही पण हार मानणारे नव्हतो,अखेर खूप प्रयत्नांनी आंब्याचे झाड सापडले.कधी जंगलात एकाच ठिकाणी दोन झाडे असल्याने लवकर समजून येत नाही.खूप उंच असे आंब्याचे झाड वरच्या फांद्यांना बरेचसे आंबे होते.ती जागा,त्यावेळी पडणार मुसळधार पाऊस आम्ही कदापी विसरणार नाही.अखेर भैरवनाथ देवाचे दर्शन घेऊन गुहेच्या दिशेने निघालो.
जसजसे ढाक बहिरी जवळ येत होता,तसतसे आमचा हुरूप वाढत चालला होता.मात्र याचबरोबर पावसाचा उत्साह वाढल्यामुळे तारांबळ उडाली. जंगलातून चालताना कितीतरी मुठे व खेकडे पावसाचा आनंद घेण्यासाठी सर सर आवाज करत बिळातून बाहेर येत होते.एरव्ही आठ महिने जमिनीत राहणारे आज मात्र पाऊस सुरू झाल्याने ते मोकळा श्वास घ्यायला बाहेर निघाले होते.जंगलाच्या वाटेच्या बाजूलाच लहानशी झोपडी दिसली.म्हणजे झोपडी वैगरे काही नाही थोडंस उन्हाचा बचाव करण्यासाठी कोणीतरी झाडांच्या फांद्यांनी उभी केलेली एक दोन माणसासाठी असावी इतपत जागा होती.पण भारीच फोटो काढायला विसरलो नाही.चालता चालता आम्ही जुन्या ट्रेकच्या गप्पा मारत चाललो होतो आणि शेवटी ढाक बहिरीच्या मुख्य कड्याजवळ येऊन ठेपलो अग्निपरीक्षा खरी समोर होती.
“पाऊस थांबायचे नावच काढत नव्हता,आता इथपर्यंत आलो आहोत आणि ट्रेक अर्ध्यावर सोडायचं की काय असं वाटू लागले.संपूर्ण तीन तासात आम्ही फक्त ९ जण आणि आमच्या सोबत सांडशी गावातून आलेले तीन मुके जीव एक प्रकारे देवांनीच आमच्या रक्षणासाठी पाठवलेले आमचे मित्र म्हणावे की काय.अशा दुर्गम वाटेतून इथपर्यंत आमच्या सोबत आलेले.या व्यतिरिक्त संपूर्ण जंगलात कोणी दिसले सुद्धा नाही.सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अनेक दैवतं कातळ भिंतीतल्या गुहांमध्ये आहेत. ढाकचा बहिरी हेही असंच अनवट दैवत आहे.मुसळधार पाऊस सुरूच होता वरून दरड कोसळली तर अशी भीती मनात दाटून आली.पावसाळ्यात चार महिने हाताच्या बोटावर मोजणारे भटकेच या वाटेवर यायचे धाडस करतात कारण कडा निसरडा व धोकादायक झालेला असतो. आम्ही ट्रेकला निघतानाच नेमका मुसळधार पाऊस सुरू झालेला त्यामुळे स्वाभाविक काळजी वाटत होती.जेव्हा असे ढाक बहिरी सारखे अत्यंत कठीण ट्रेक असतात तेव्हा सावधानता,एकाग्रता आणि आत्मविश्वास या गोष्टी तुमच्या जवळ असणे अत्यंत आवश्यक असते हे गुण तुमच्यात असतील तर मग कितीही अवघड ट्रेक असो तो पूर्ण होतो.आता कातळटप्पा चढायचं सावधानता बाळगून संपूर्ण मान वर करून पाहिलं तर आकाशाला गवसणी घालणारा कडा व बहिरीच्या गुहेतून सोडलेला खालपर्यंत लोखंडी रोप व आणखी एक दोरखंड आता या साधनांचा वापर करूनच पुढील अत्यंत कठीण पॅच सर करायचा होता. कातळात कोरलेल्या पायऱ्या आकर्षित करीत होत्या आणि वरून पाऊस कोसळत असल्याने संपूर्ण कड्याला धबधब्याचे रूप प्राप्त झाले होते.अत्यंत अवर्णनीय पण तेवढंच धोकादायक असे हे चित्र होते.उभ्या कड्याच्या छाताडावरून पायाचे फक्त तळवेच बसतील अशा मोजक्याच जागेतून चालताना तोल सावरण्यासाठी आमची सर्वांचीच चांगलीच दमछाक झाली.सर्व मित्रांना सुखरूपरित्या गुहेत पोहोचवल्यानंतर मागे आकाश आणि मी होतो. पुढे आकाश आणि त्याच्या पासून चार फूट मागे मी होतो.काही कळायचं आत आमच्या दोघांच्या मधून पावसामुळे वाहून आलेला एक दगड जोरात खाली येऊन दरीत कोसळला.आमचं नशीब बलवत्तर होतं म्हणून ठीक…साक्षात आम्हांला “ढाक बहिरी डोंगरदेवता प्रसन्न झाली होती असंच म्हणावं लागेल.त्या दगडाचा एवढा वेग होता की त्याची एक चिपकी शरद मित्राच्या हाताला नुसती चाटून गेल्याने शरदच्या हाताला थोडंस रक्त आलेले.यावरून अंदाज आला असेल पावसाळी हा ट्रेक करणं अत्यंत धोकादायक आहे.ही चढण पार करताना आमची होणारी धावपळ, याबरोबरच डाव्या हाताला आपला घास घेण्यास ‘आ’ वासलेली प्रचंड दरी आणि सर्वात शेवटी दोरखंड आणि लाकडाची मोळी यांना धरून नव्वद अंशाच्या कोनामध्ये पार करावा लागणारा खडा कातळटप्पा अशी सारी एकाहून एक सरस असलेली ट्रेकर्सची खरी परीक्षा होती.अखेर ही परीक्षा उत्तम गुणांनी पास करून बहिरी देवाच्या गुहेत दाखल झालो.
नारळ वाढवून देवाचे मनोभावे दर्शन घेतले व शांतचित्ताने गुहेत बसून मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला.गुहेत असणारी थंडगार व मधुर पाण्याची टाकं आपल्या धडधडणाऱ्या छातीचे ठोके नक्कीच कमी करतात.भैरवाच्या गुहेला लागूनच आणखी दोन गुहा आहेत यापैकी एकात कसलेही अवशेष नाहीत. गुहेत जेवण बनवण्यासाठी असंख्य भांडी आहेत. जेवण बनवल्यानंतर परत भांडी स्वच्छ करून ठेवण्याची प्रथा असून ती ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी ठेऊन द्यावीत. दुसरी गुहा अर्धवट खोदलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे पुन्हा भैरवाच्या गुहेत येऊन समोरचा आसमंत निवांतपणे फक्त न्याहाळत बसायचं.सभोवार दिसणारं सृष्टीचे सौंदर्य हे वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवून बघणं किती आनंददायी असतं नाही का हे इथे आल्यानंतरच क्षणात जाणवते.समोर दिसणारी राजमाची किल्ल्याची जोडगोळी आणि त्याही पलीकडे दिसणारी नागफणी आपल्याकडे कौतुकाने पाहत असल्याचा भास होतो. नीट निरखून पाहिलं असता एखादी पुणे-मुंबई ट्रेन आपल्याला भोंगे वाजवीत डोंगरांच्या अंगाखांद्यावरून बागडतानाचे विहंगम दृश्य पहायला मिळते.
मधली एक मजेशीर गंमत सांगतो,आम्ही जेव्हा ढाकच्या गुहेत पोहोचलो तेव्हा सर्वजण ओलेचिंब झालो होतो.थंडीने सर्वाना हुडहुडी भरलेली काहींची परिस्थिती बिकट होती दुसरे कपडे पण आणले नव्हते.गुहेतच सुक्या फाट्यांचा एक भारा नजरेला पडला.माचीस आणलेली पण पावसात भिजून गेल्यामुळे पेट घेईना,मंदिरातील पण माचीस ओली त्यामुळे शेकोटी काही केल्या पेटेना.अर्धा तास युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.भावाच्या मुलाने सोबत लायटर आणला होता,हे धावपळीत नंतर उमगले आणि मग काय मस्तपैकी शेकोटी पेटवली.एरव्ही शेकोटी आपण हिवाळ्यात पेटवतो आणि आज तर चक्क पावसात भिजल्यामुळे पेटवावी लागली.ती शेकोटी नव्हतीच तर ढाक बहिरी देवाने आमचं सर्वांचे थंडीपासून बचाव करण्यासाठी दिलेली भेट होती.शेकोटीमुळे एक नवीन ऊर्जा मिळून ताजेतवाने झालो. दोन तासांच्या अवधीत आम्हांला अशमयुगीन काळ आठवला.इतिहासाच्या पुस्तकात वाचलं होतं ते आज प्रत्यक्ष अनुभूती घेत होतो.सर्वच कपडे काट्यांच्या साहाय्याने शेकोटी वर सुकवून घेतले.
जर गुहेत सुकी लाकडं नसती तर काय हालत झाली असती,कल्पना न केलेलीच बरी..! प्रत्येकाने जवळ आणलेला सुका खाऊ,गणेशनी आणलेली मटकी,चटणी व भाकरी पुन्हा खाऊन संपूर्ण ढाक बहिरीचं निरीक्षण करीत बसलो होतो. इथूनच बहिरीचा डोंगर आणि प्रसिद्ध कळकरायचा सुळका या दोन्ही वास्तूंच्या खिंडीमध्ये येतो. कळकरायचा सुळका हे अनेक पट्टीच्या गिर्यारोहकांचं आवडीचं ठिकाण. या सुळक्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचं साहित्य आणि तिथलं चढाईचं तंत्र याची माहिती असल्याशिवाय जाणं म्हणजे केवळ अशक्यच! ही दृश्य आणि इथला थरार अनुभवूनच परतीच्या प्रवासाला निघालो.
ढाकचा बहिरी म्हणजे सहयाद्रीच्या कातळात लपलेलं एक श्रद्धास्थान आहे.त्यापेक्षाही दुर्गवेडय़ांसाठी एक अनोखं आव्हान आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. साहसाच्या जोडीला भक्तीची किनार असलेल्या या डोंगरदेवतेचे दर्शन घेताना इथल्या रांगडय़ा निसर्गाचा अनुभवसुद्धा आपल्याला समृद्ध करून जातो. या डोंगरदेवतेचं दर्शन म्हणजे एक प्रकारे साहसी अनुभवच!साहसी ट्रेक करायचा असेल, त्याचबरोबर एका नितांत सुंदर डोंगरदेवतेचं दर्शन घ्यायचं असेल तर पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या ढाकच्या बहिरीशिवाय उत्तम पर्याय असूच शकत नाही. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांत वस्ती करून राहिलेल्या देवदेवतांच्या नावानेच ढाकच्या बहिरीसारखी ठिकाणं ओळखली जातात. ‘बहिरी’ अथवा ‘भैरी’ या नावांनी अपभ्रंश झालेल्या भैरवनाथाचं दर्शन घेण्यास स्थानिक गावकरी नित्यनेमाने दरवर्षी जात असतात. ढाक गावातील मित्रवर्य मनोज ढाकवल ने सांगितल्याप्रमाणे त्याचे वडील श्री विठोबा ढाकवल व त्याचे काका श्री भिवा ढाकवल गेली अनेक वर्षे ढाक बहिरीचे पुजारी म्हणून काम पाहतात.पावसाळी चार महिने सोडले तर बाकी सर्व महिने ढाक गुहेत नित्यनियमाने पूजा होत असते.म्हणूनच या डोंगरदेवतेच चं दर्शन म्हणजे खरं भाग्य पण नवख्या भटक्यांसाठी मात्र हे दर्शन अत्यंत दिव्य आणि साहसानेच पूर्ण करावं लागतं.
◆संपूर्ण माहिती ◆ :-
ट्रेकचे नाव :- ढाक बहिरी
डोंगररांग :-राजमाची सहयाद्री डोंगररांग
चढाई :- अत्यंत कठीण
उंची:-२७०० फूट (८२३ मी)
● इतिहास ● :-
“हा किल्ला ढाक बहिरी म्हणून प्रसिद्ध आहे.श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या जागेचा टेहळणीसाठी वापर केला जात होता.पावसाळ्यातील चार महिने सोडले तर या ठिकाणी नित्यनेमाने ढाक देवाची पूजा सुरू असते.येथील ढाक गावातील ग्रामस्थ श्री विठोबा ढाकवल व श्री भिवा ढाकवल येथे पुजारीचे काम पाहतात.महान इतिहासकार श्री गोपाल नीलकंठ दांडेकर यांनी ढाक बहिरीचा शोध लावला.अधिक माहितीसाठी त्यांचे दुर्गभ्रमंती हे पुस्तक वाचू शकता.किल्ल्याचा धार्मिक इतिहास जतन करण्याचा प्रयत्न येथील रहिवासी करत असतात.खरं पाहता ढाक बहिरी एक गुहा(लेणी) आहे.या बहिरीच्या गुहेत शेंदुर फासलेली पहिली मूर्ती श्री भैरवनाथ महाराज,दुसरी मूर्ती जोगेश्वरी मातेची आणि तिसरी मूर्ती श्री गणरायाची आहे.ढाक बहिरीचा वापर आजूबाजूच्या( राजमाची) किल्यावर पहारा देण्यासाठी केला जायचा असे इतिहासात दाखले आहेत.ढाकच्या बाजूला असणाऱ्या सुळका कळकराई या नावाने ओळखला जातो.
●ट्रेकला जाताना काय करावे ● :-
ढाक बहिरी इतिहासप्रेमी,गिर्यारोहक ,साहसप्रेमी यांना आकर्षित करते. एक सांगावेसे वाटते ते म्हणजे ढाकवर यायचे झाल्यास गिर्यारोहणाचे साहित्य व गिर्यारोहण तंत्राची माहिती असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे.किंवा कमीतकमी स्थानिक गाईड घ्या सोबत सांडशी किंवा ढाक गावातून गाईडची सोय होऊ शकते. यापूर्वी अनेक जण ढाकच्या जंगलात वाटा चुकून भरकटलेले आहेत व इथे अनेक रेस्कु ऑपरेशन पार पडलेले आहेत.
● भौगोलिक स्थान ● :-
“ढाक बहिरी या ठिकाणी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सांडशी गावातून या स्थित बुलंद किल्यावर पोहोचता येते. कर्जत वरून थेट वदप आल्यावर तिथून साडे तीन किलोमीटर पायपीट केल्यानंतर ढाक गाव लागते.तिथून ही ढाक ट्रेक करता येतो. लोणावळ्याच्या उत्तर दिशेला दहा मैल अंतरावर राजमाची आहे.त्या सभोवताली असलेल्या घनदाट जंगलात बहिरी डोंगरावर ढाकचा किल्ला उभा आहे.तो किल्ला म्हणजे दक्षिणोत्तर पसरलेला अजस्त्र डोंगर.गुहेच्या समोरच राजमाचीचे श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन बालेकिल्ले दिसतात. येथूनच नागफणीचे टोक, प्रबळगड, कर्नाळा, माथेरान असा विस्तीर्ण परिसर दिसतो. गडाच्या पश्चिमेला पळसदरी तलाव, पूर्वेला उल्हास नदीचे खोरे आहे.
●गाईड/ वाटाड्या ● :-
हा ट्रेक दुर्गम भागात असल्याने तुम्ही सांडशी गावातून किंवा ढाक गावातून कमीतकमी रुपयात एखादा वाटाड्या किंवा गाईड घेऊ शकता.थोडे पैसे जातील पण तुम्ही निश्चिंत व्हाल.आणि स्थानिकांना रोजगार मिळेल.हा दुर्गम भाग असल्याने वाटाड्या घेणं अत्यंत आवश्यक आहे.
● पाहण्याची ठिकाणे ● :-
ढाकच्या किल्ल्याचे दोन भाग आहेत.
(१) बहिरीची गुहा
(२) ढाक किल्ला
(३)कळकराई सुळका
(४) सुभेदार धबधबा
● बहिरी गुहा ● :-
गुहेची माहिती वरील प्रवासवर्णन मध्ये दिलेली आहे
● ढाकचा किल्ला ● :-
ढाक गावात पोहोचल्यावर देवी गारुआईचे मंदिर आहे.तेथील ग्रामस्थ मनोभावे देवीची पूजाअर्चा करतात.या किल्ल्यावर पाण्याचे पाच टाक आहेत,एक तुटलेल्या अवस्थेत दरवाजा आहे,बाकी जास्त काही अवशेष नाहीत.कळकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीत चढतांना एक वाट डावीकडे जाते. या वाटेने तीस मिनीटात गड माथ्यावर पोहोचता येते. किल्ल्याचा माथा फार लहान आहे. गड फिरण्यास तीस मिनिटे पुरतात.
●कळकराई सुळका ●:-
सुमारे 200 फूट उंचीचा व 90 अंश कोनातील हा सुळका आहे.गिर्यारोहण चढाईची सुरुवात करण्यासाठी हा सुळका बरेच जण वापरतात पण त्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.SCI संस्थेने या सुळक्याला बोल्ट ठोकून संपूर्ण मार्ग सुरक्षित केला आहे.
●सुभेदार धबधबा● :- ढाक बहिरीच्या वाटेवरच सुभेदार धबधबा आहे यासाठी गावातील स्थानिक वाटाड्या व माहितगार व्यक्ती असणे गरजेचे आहे.हा धबधबा उथळ पाण्याचा व धोकादायक आहे पाणी कमी असेल तेव्हा जाणे रास्त आहे.
●पोहोचण्यासाठी लागणारा वेळ ● :-
ढाक बहिरी किल्ल्यावर जर सांडशी गावातून आलात तर सुमारे २ ते ३ तास लागतात.
कर्जत – वदप – ढाक – वरून आलात तर साधारण ३ किंवा ४ तास जास्त वेळ लागतो.
● भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ ● :-
मान्सूनच्या हंगामाच्या शेवटी हिवाळ्याच्या प्रारंभापर्यंत किल्ल्यावर जावे शक्यतो पावसाळ्यात जाणे टाळावे.
●पोहोचण्याच्या वाटा ● :-
१)पुणे येथून एसटी (राज्य परिवहन) बस, व्होल्वो, कर्जत येथे लोकल ट्रान्सपोर्ट उपलब्ध आहे जे पुणेपासून ९९ किलोमीटर अंतरावर आहे, कर्जत येथून एसटी (राज्य परिवहन) बस किंवा ढाक बहिरी किल्ल्याच्या सांडशी गावापर्यंत दहा सीट इको उपलब्ध आहे.
२)पुणे मार्गे – पुणे एक्सप्रेस मार्ग लोणावळ्यापर्यंत, लोणावळा येथून कर्जत, तेथून सांडशी पर्यंत जाता येते.
३) मुंबईहून कर्जतला एसटी (राज्य परिवहन) बस उपलब्ध आहे जी मुंबईपासून सुमारे ६३ किलोमीटर अंतरावर आहे, कर्जत येथून एसटी (राज्य परिवहन) बस किंवा ढाक बहिरी किल्ल्याच्या सांडशी गावात पोहोचण्यासाठी दहा सीटर इको उपलब्ध आहेत.
४)मुंबई – पनवेल – कर्जत – सांडशी
५) दुसरा एक मार्ग आहे.कर्जत मध्ये आल्यावर थेट वदप.या ठिकाणी सुद्धा दहा सीटर इको रिक्षा उपलब्ध आहेत.वदप वरून मात्र पुढील प्रवास साडेतीन किलोमीटर पायपीट करून ढाक गावात पोहोचता येते.ढाक गावात आल्यानंतर पुढील वाट थेट किल्यावर घेऊन जाते.
६) ढाक बहिरीला पोहचण्यासाठी पुणे – कामशेत – जांभिवली या मार्गाने जांभिवली गावापर्यंत जाता येते. तेथून पुढे अर्धा ते पाऊण तास चालल्यानंतर कोंडेश्वर मंदिर लागते. तेथून जंगलवाट सुरू होते. त्या वाटेने पुढे गेल्यानंतर एक चिंचोळी खिंड लागते. ती खिंड ढाकचा किल्ला आणि सरळसोट उभा कळकरायचा सुळका यांच्या मधोमध आहे. खिंड आठ ते दहा मीटर लांब आहे. खिंड पार केल्यावर पुढे कातळकडा लागतो.
●जेवण व मुक्काम ● :-
कर्जत वरून सांडशी गावात जेवणाची, राहण्याची व पार्किंगची सोय आहे.गडावर जाताना दुपारच्या जेवणाची ऑर्डर देता येते.याशिवाय कर्जत वरून वदप मार्गे ढाक गावात सुद्धा राहण्याची सोय होऊ शकते.मात्र जेवणाची सोय स्वतः लाच करावी लागेल.
गडावर राहण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे बहिरीची गुहा हेच होय.जेमतेम दहा ते बाराजण आरामात राहू शकतात.मात्र गडावर जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.
● माहिती साभार ● :- दुर्गभरारी,ट्रेकक्षितिज,मराठी ब्लॉग,वर्तमानपत्रे,मित्रपरिवार
●तळटीप ●:- कोणत्याही चुकीच्या कृत्यांचे आम्ही समर्थन करत नाही हा लेख केवळ माहितीसाठी आहे.
लेखक
श्री.रोहिदास राघो ठोंबरे
संस्थापक शिवकार्य ट्रेकर्स,खालापूर